16 नोव्हेंबर हा भारतीय वृत्तपत्र
परिषदेच्या स्थापना दिन. हा दिवस ‘राष्ट्रीय पत्रकार
दिन’
म्हणून साजरा करण्यात येतो.
या दिनानिमित्त ‘अभिव्यक्तीचे माध्यम
म्हणून व्यंगचित्र व अर्कचित्र कलेचे महत्त्व आणि प्रभाव’ हा विषय जाहीर करण्यात
आला आहे. श्रेष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण आणि राजेंद्र पुरी यांचे स्मरण
या निमित्ताने करण्यात येत आहे.
हजार शब्द जे सांगू शकणार नाही ते एक चित्र सांगू
शकते. याच न्यायाने हजार चित्र जे सांगू शकणार नाही ते एक व्यंगचित्र सांगू शकते, असं म्हटल्यास
वावगे ठरु नये. संपादकाला जो मुद्दा
मांडण्यासाठी एक किंवा दोन
स्तंभ खर्ची करावे लागतात
ते व्यंगचित्रकार एका
रेखाचित्रात अधिक प्रभावीपणे मांडतो.
व्यंगचित्र
न आवडणारी व्यक्ती सापडणे अवघडच आहे. समाजाच्या विविध क्षेत्रातील व्यक्तींपैकी
निवडक मान्यवरांच्या व्यंगचित्रांविषयीच्या भावना येथे मांडण्यात आल्या
आहेत.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे म्हणतात, आज समाजप्रबोधनासाठी विविध साहित्यांचा, लेखांचा आधार घेवून प्रयत्न केला जात आहे. अशा व्यवस्थेमध्ये
मोठ्या लेखांपेक्षा ‘लहान’से व्यंगचित्र माणसाच्या मनाला स्पर्श करुन जाते व त्यातून
समाजपरिवर्तनासाठी उपयोग होवू शकतो यावर माझा विश्वास आहे.
दृष्टि लावून सावज शोधणं हे जसं घडतं, तसंच सावज दृष्टित चालून येणं असाही अनुभव येतोच. व्यंगचित्रातील
शिकार ही पुष्कळदा सामाजिक शिकवणही असते, अशा शब्दांत ज्येष्ठ साहित्यिक प्रा.फ.मुं. शिन्दे व्यंगचित्रकलेचा
गौरव करतात.
ज्येष्ठ विचारवंत कुमार केतकर यांच्या
भाषेत ‘ व्यंगचित्र हे एक भाष्य
असते. कित्येकदा एक हजार शब्दांच्या लेखात वा अग्रलेखात जे भाष्य चपखलपणे केले
जाऊ शकत नाही, ते एका व्यंगचित्रातून साध्य
होवू शकते. म्हणजेच फक्त कुंचला-कौशल्य असून चालत नाही तर दृष्टिकोनही हवा. तो
दृष्टिकोन असा हवा की, ज्यामुळे
समाजातील विसंगतीकडे निर्देश करतांना वाचक अंतर्मुखही व्हायला हवा.
व्यंगचित्रकार रणजित देवकुळे म्हणतात ‘ एखादा विचार चार-पाच ओळींमध्ये मांडला तर तो
वाचणा-याला लगेच कळेलच असे नाही. पण तोच विचार एखाद्या चित्रातून मांडला तर
समजायला सोपा पडतो. त्यातही तो व्यंगात्मक रुपाने मांडला तर तो अधिक परिणामकारक
वाटतो. त्यामुळेच व्यंगचित्रकला ही जास्त परिणामकारक ठरते. व्यंगचित्रकला ही आपला विचार, गा-हाणे,
विडंबनात्मक पध्दतीने मांडण्याची एक प्रभावी कला आहे. व्यंगचित्रांचा परिणाम
समाजावर चटकन होतो, म्हणून व्यंगचित्रकला
ही खूप महत्त्वाची कलाआहे, असे
वाटते.
प्रख्यात व्यंगचित्रकार अनिल डांगे म्हणतात, ‘कोणताही व्यंगचित्रकार हा शासन व समाजातील व्यंग
हेरुन त्यावर बोट ठेवतो; हे
सर्वांच्या भल्यासाठीच ... आणि सर्वसामान्यांना ते आवडतेच, असे दिसून येते. कोणत्याही बातमीच्या तोडीचे (काकणभर
अधिकच) सत्य लोकांसमोर मांडण्याचे काम व्यंगचित्र किंवा अर्कचित्र करते, म्हणूनच एक व्यंगचित्र शंभर अग्रलेखाच्या बरोबरीचे समजले जाते. यातच व्यंगचित्राचे
महत्त्व अधोरेखीत होते. त्यामुळे व्यंगचित्रकारांवर कुणी निर्बंध लादणे योग्य
ठरत नाही. यात एक अडचणीची बाब अशी की, आपली भारतीय वर्तमानपत्रे कोणत्या ना कोणत्या
राजकीय पक्षाचा पुरस्कार करणारी असतात.. तुम्ही जर राजकीय व्यंगचित्रकार असाल
तर त्या ठिकाणी तुम्हाला व्यंगचित्र स्वातंत्र्य गुंडाळून ठेवून त्यांच्या पुरस्कर्त्या
पक्षाचे हित लक्षात ठेवूनच काम करावे लागते;
मग तुम्हाला ते
आवडो ना आवडो... ’ अशा
स्पष्ट शब्दांत व्यंगचित्रकार अनिल डांगे आपले मत व्यक्त करतात.
व्यंगचित्रकाराने
देखील काही पथ्ये पाळायलाच हवी. व्यंगचित्रकार म्हणून भूमिका बजावताना त्याने
व्यक्तिगत मतप्रदर्शन करण्यापेक्षा योग्य विषयावर,
योग्य पध्दतीने,
योग्य ते आपल्या व्यंगचित्रातून दाखविणेच योग्य
आहे. त्याने आपला व्यक्तिगत पक्ष-धर्म-जात- मतप्रवाह सारे-सारे बाजूला ठेवायला
हवे अन् ही फार मोठी जबाबदारी आहे, याचीही जाणीव अनिल डांगे करुन देतात.
ज्येष्ठ
व्यंगचित्रकार व साहित्यिक बाबू गंजेवार
हे म्हणतात,
‘व्यंगचित्रकलेची
सुरुवात कशी झाली ते एक कोडेच आहे. उपहासात्मक कथा तात्पर्य कथा ह्याची सुरुवात
विष्णू शर्मा (आर्य चाणक्य?) याने ‘पंचतंत्र’ ह्या रूपक कथांद्वारे केली. त्यात पशू-पक्षी बोलतात. व्यंगचित्रात सुद्धा सजीव निर्जीव वस्तू बोलतात.
इसापनिती ही सुद्धा याच प्रकारात मोडते. ह्या सर्व कथांचा
उद्देश हा मर्म सांगणे हाच असतो आणि व्यंगचित्रे सुद्धा तेच सांगतात. मात्र
व्यंग्यचित्रकार हा नुसताच चांगला चित्रकार असून चालत नाही. तो सव्यसाची, चौफेर निरीक्षण, वाचन आणि सेन्स ऑफ़
ह्यूमर असलेला पाहिजे व हे तेवढे सोप्पे
काम नाही. बिरबलाप्रमाणे तो हजरजबाबी पण लागतो तरच व्यंगचित्रातून अभिव्यक्ति उत्कृष्ट होते. एखादा विषय मोजक्या
रेषा आणि शब्द यांच्या सहाय्याने स्पष्ट करणे हा चित्रकलेचा नसून सहित्याचा अनमोल आविष्कार आहे. अर्थात चित्रकलेचा उत्तम पाया आवश्यक आहेच. पण
वेड्या वाकड्या रेषा आणि बाष्कळ विनोद
असलेली व्यंगचित्रे अभिव्यक्तिचा दर्जा कमी करतात. उत्कृष्ट रेखांकन, मार्मिक उपहास
असलेली व्यंगचित्रे सर्वश्रेष्ठ होत’.
व्यंगचित्र
अभ्यासक व साहित्यिक डॉ. मधुकर
धर्मापुरीकर सांगतात, ‘ तळहाताएवढ्या व्यंगचित्रात जीवनानुभवाचा चमकदार क्षण जो हसवून
जातो, तो धरुन ठेवलेला
असतो. दैनंदिन अनुभवातली अस्वस्थ करणारी विसंगती दाखवून देणे, ही उत्तम व्यंगचित्रांची
प्रकृती असते. व्यंगचित्र हे त्यामुळे चित्रकलेपासून बाजूला होवून साहित्याशी
जवळीक साधत असते’.
थोडक्यात
अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून व्यंगचित्र अथवा अर्कचित्राचे महत्त्व आणि
प्रभाव याबाबत कोणाचेही दुमत दिसून येत नाही.
'कार्टून' या शब्दाची
मूळकथाही रंजक आहे. 'कार्टोने' असा मूळ इटालियन
शब्द आहे
आणि त्याचा अर्थ चित्र
नव्हे तर विशिष्ट प्रकारचा
कागद असा आहे. अशा जाड कागदावर
भित्तीचित्रांची मूळ रेखाटने करतात. अशी रेखाटने जेव्हा
इंग्लंडच्या पार्लमेंट हाऊसच्या भिंतीवर
रंगविण्याचे काम चालू झाले, त्यावेळी बरेच
दिवस तो चर्चेचाच विषय
झाला होता. त्यावरुनच पुढे
तिथे चालणाऱ्या राजकीय घडामोडींवर
आधारित उपहासदर्शकचित्र म्हणजे
राजकीय व्यंगचित्रे असे
त्याचे अर्थांतर झाले. कार्टून Cartoon या इंग्रजी शब्दाचा
मराठी अर्थ म्हणून 'व्यंगचित्र' शब्द वापरला जातो.
'व्यक्ती, क्रिया, पध्दती
यांचे अतिशयोक्तीने केलेले
प्रकटीकरण किंवा आविष्कार म्हणजे
व्यंगचित्र किंवा अर्कचित्र होय.
व्यंगचित्रांचे निश्चित
असे प्रकार नाहीत, तथापि
ढोबळमानाने पुढीलप्रमाणे प्रकार
पाडता येतात.
शब्दहीन व्यंगचित्र: व्यंगचित्रप्रकारातील सर्वात
उत्तम म्हणून या प्रकाराचा
उल्लेख करावा लागेल. कारण अशी व्यंगचित्रे 'शब्दविण संवादू' असतात. कोणताही आशय किंवा
संदेश पोहोचविण्यासाठी भाषेची
गरज नसेल तर अशी
व्यंगचित्रे उपयोगी ठरतात.
व्यंगचित्रकार
हा रेषांचा जादूगार असतो.
रेषांच्या आधारे तो बोलतो,
हसवतो आणि जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टीपण
देऊन जातो. ज्या व्यंगचित्रासाठी शब्दांची,
मजकूराची आवश्यकता नसते, अशा
व्यंगचित्रांचा दर्जा वरचा असतो.
शब्दात न मावणारे, शब्दांपलिकडले
अर्थ अशा व्यंगचित्रांतून व्यक्त
होतात.
शब्दासहीत व्यंगचित्र: व्यंगचित्रातील आशय
व्यक्त करण्यासाठी शब्दांची आवश्यकता
भासते. त्याशिवाय
त्यास पूर्णत्व येत नाही. अशा व्यंगचित्रातील आशय
फक्त साक्षर व तोही
त्या भाषेचे ज्ञान असणा-या
व्यक्तीस कळू शकतो. शब्दांची मदत घेवून
ही व्यंगचित्रे आपली परिणामकारकता सिध्द
करत असतात.
व्यंगचित्रपट्टीका: या व्यंगचित्रातल्या विनोदाची,
नाट्याची, उपहासाची उकल दोन किंवा त्याहून अधिक टप्प्यात
होते. यामध्ये कधी शब्दांची मदत घेतलेली असते तर कधी
नाही.
व्यंगचित्रमालिका: व्यंगचित्रमालिकेत एकाच किंवा वेगवेगळया विषयावरील
व्यंगचित्रे असतात. व्यंगचित्रातील आशय
वा संदेश प्रदान करण्यासाठी
दुस-या व्यंगचित्रांची गरज
नसते.
व्यंगचित्र प्रकारामध्ये राजकीय,
सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक
जीवनावरील भाष्य करणारी व्यंगचित्र
असू शकतात. वेगवेगळया देशातील प्रश्न, तेथील
सामाजिक पार्श्वभूमी यामध्ये
काही दोष, उणिवा, विसंगती
आढळली तर व्यंगचित्रकार ती चित्रबध्द
करतो. व्यंगचित्रांना विषयाचे बंधन नसते. जीवनाच्या
प्रत्येक क्षेत्राला स्पर्शण्याचे त्यात
सामर्थ्य असते.
व्यंगचित्र प्रकारांचा बारकाईने
अभ्यास केल्यानंतर बहुतांश व्यंगचित्रे
'विसंगती'वर आधारलेली
आढळतात. मग ती सभोवतालच्या
परिस्थितीतील सामाजिक, आर्थिक, धार्मिक जीवनातील असू शकते. विनोद आणि व्यंगचित्र
दोन्हीही विसंगतीमुळे
निर्माण होतात. म्हणूनच 'विसंगती' हा व्यंगचित्रांचा आत्मा असतो, असे म्हणता येऊ
शकते. व्यंगचित्र किंवा अर्कचित्र म्हणजे हास्यचित्र असा काहींचा
गैरसमज आहे.
'हास
(हास्य)
हा मानवी मनाचा एक स्थायीभाव
असून हास्य त्याचे शारीरिक
प्रकटीकरण होय. मानव हा हसणारा
आणि हसवणारा प्राणी आहे. हसवता-हसवता दोष
दाखवून देणे मानवी संस्कृतीत
चांगले लक्षण मानले जाते. जीवनातील विसंगती, व्यंग,
दोष, उणिवा यावर मार्मिकपणे,
अचूकपणे बोट ठेवून जीवनाचा
आनंद कसा लुटावयाचा हे व्यंगचित्रातील विनोद
सांगतो, असा विनोद जीवनावर
एक प्रकारचे भाष्य करतो.
मार्शल मॅकलुहान
संदेशवहनाच्या माध्यमांचे वर्गीकरण शीत
आणि उष्ण माध्यमात करतो.
उष्ण माध्यमाद्वारे एकाच
इंद्रियाला अनुभूती मिळते व त्यामध्ये
जास्तीत जास्त तपशील पुरवला
जातो. उदाहरणार्थ 'छायाचित्र' हे उष्ण
माध्यम आहे, त्यातील तपशील
पूर्ण असतो. याच्या उलट 'व्यंगचित्र' हे शीतमाध्यम
आहे, कारण त्यातील तपशील
त्रुटीत असतो.
उष्ण माध्यमामध्ये
मानवी इंद्रियांचे
मर्दन होत नाही. सर्व
आशय दिलेला असल्याने ते निष्क्रिय
राहतात, याउलट शीत
माध्यमांमध्ये आशय शोधून काढावा लागतो.
उत्तम व्यंगचित्र हसत-खेळत
जीवनावर उत्कट भाष्य करते. हसवणे एवढा एकमेव
उद्देश व्यंगचित्रांचा नसतो
तर मानवी जीवनातील विसंगती
चित्रमाध्यमातून मांडणे हा असतो. व्यंगचित्र कुठल्याही विषयावर
असो उत्तम व्यंगचित्र हे माणसाच्या
मनाला आणि बुध्दीला एकाच
वेळी आवाहन करु शकते. कमीतकमी शब्द आणि
रेषांचा आधार घेऊन जीवनाचे
सत्य सांगण्याचे कार्य व्यंगचित्र
करीत असते. व्यंगचित्रात शारीरिक
व्यंग्यावर टीका नसावी. दोष आणि विसंगती दाखविणे हा व्यंगचित्रांचा हेतू असला तरी
ते द्वेष भावनेने प्रेरित झालेले नसावे. व्यंगचित्र समजण्यास क्लिष्ट नसावे.
सहजता असेल तर त्यातील आशय, संदेश ग्रहण करणे सोपे असते. व्यंगचित्रातील विनोद, उपहास,
आशय शोधून काढण्यासाठी वाचकाची विनोदबुध्दी आणि
संशोधनवृत्ती कसास
लागू नये.
कल्पनाशक्ती, प्रयोगशीलता, डोळस निरीक्षण, शोधक दृष्टी, राजकीय,
सामाजिक, आर्थिक, जीवनातील
विसंगती,
दोषांवर भाष्य करण्याची क्षमता आणि रेषांवर हुकूमत असली की
व्यंगचित्रकार तयार होतो.
व्यंगचित्रकार अनेक
गोष्टींचा बनलेला असतो. तो विदूषक
असतो, तत्वचिंतक असतो आणि
समाजाचा पहारेकरीही असतो. सभोवतालच्या
जीवनातील सुख-दु:ख, विसंगती,
दोष पाहिल्यानंतर व्यंगचित्रकाराला अंत:करणापासून तीव्रतेने व्यक्त करण्यासारखे
जाणवले तर व्यंगचित्र जन्मास
येते, असे व्यंगचित्र विनोदीच
असावे अशी अपेक्षाही चुकीची
आहे.
गेल्या काही वर्षात समाजात अनेक बदल वेगाने घडत आहेत. माहिती-तंत्रज्ञान, तंत्र-वैज्ञानिक क्रांती, आर्थिक परिस्थितीत होत असलेले बदल यांतून केवळ जीवनशैलीच बदललेली नाहीए तर मूल्ये आणि विचार करण्याच्या पध्दतीतही
बदल घडतांना दिसत आहेत. त्यामुळे जुन्या
व्यंगचित्रावरुन वाद होण्याच्या घटना दिसून येतात.
व्यक्तिजीवनातील आणि समाजजीवनातील व्यंगे सूक्ष्म निरीक्षणाने चित्रबध्द
करण्याचे काम व्यंगचित्रकार करतो, त्यामुळे अशा व्यंगचित्रांचे
स्वरुप प्रखर हल्ला करणारे किंवा कुणाचे मन दुखावणारे नसते. मनोरंजन करणे एवढा एकमेव उद्देश
व्यंगचित्राचा नव्हे तर ते विचार व्यक्त करण्याचे एक महत्त्वपूर्ण साधन आहे.
व्यक्ती किंवा एखाद्या समूहाविरुध्द धर्म, जात, भाषा, वंश आणि वर्ण किंवा राहण्याचे ठिकाण अशा कोणत्याही
मुद्दयावरुन शत्रूत्व अथवा द्वेष निर्माण करणारे व्यंगचित्र अथवा अर्कचित्र
काढण्याचे व्यंगचित्रकारांनी टाळावयास हवे. आज असामाजिक तत्वे घटना, संदर्भ सत्यतेची शहानिशा न करताच
प्रकट होतांना दिसतात. त्यांना चेहरा नसतो. फेसबुक, ट्वीटर, व्हॉट्सअप, हाईक यासारख्या सोशल मिडीयाचा आधार घेवून सामाजिक
शांतता भंग करण्याचा प्रयत्न होतांना दिसतो. व्यंगचित्रांनी किंवा शब्दांनी
घायाळ होणारा समाज हे अपरिपक्वतेचे लक्षणच म्हणावे लागेल. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या
नावाखाली
विद्वत्ता नसतांना स्वार्थासाठी प्रक्षोभक वक्तव्य करणा-यांकडे व्यंगचित्रकारांनी
दुर्लक्ष व्हावयास हवे. काही व्यंगचित्रकार
अशा वक्तव्यांचा समाचार घेतांना दिसतात. मात्र अशा विखारी वक्तव्य करणा-यांना अनुल्लेखाने
मारणेच योग्य ठरेल. राज्यघटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्रयांचा उपभोग
घेतांना असलेल्या जबाबदारीचे भान सर्वांनीच ठेवावयास हवे. कोणतेही स्वातंत्र्य
निरपवाद, अमर्याद नसते,याचीही जाणीव ठेवली पाहिजे. स्वातंत्र्याबरोबरच एक
जबाबदारीही येते, ती जबाबदारी आणि स्वयंशिस्त
यांचे पालन व्यंगचित्रकारांनी करावयास हवे.
अन्यथा वेगवान व बहुव्याप्त
संवाद साधनांच्या मदतीने असामाजिक शक्ती सामाजिक शांततेला धोका पोहचवू
शकतात. बदलत्या वातावरणात संवाद माध्यमांचा
गैरफायदा घेवून आग भडकावू शकतात.
आपल्यावरील
टीका पचवण्याइतकी सहनशक्ती दाखवता न येणे यालाच असहिष्णुता म्हणतात. देशांत आणि
परदेशांतही व्यंगचित्रांवरुन-अर्कचित्रांवरुन झालेले वाद, हिंसाचार, रक्तपात पाहिल्यानंतर
व्यंगचित्रकारांनी किती सजग रहायला हवे, याची जाणीव होते. व्यंगचित्रे पहायला-वाचायला अनेकांना आवडते, पण स्वत:वरील व्यंगचित्र-अर्कचित्र आवडणारे किती
असतील, हा प्रश्नच आहे. कारण व्यंगचित्रातील
टीका खिलाडूवृत्तीने स्वीकारण्याचे प्रमाण कमी होतांना दिसत आहे. राजकीय-सामाजिक
व्यंगचित्रकारांना याचा वेळोवेळी अनुभव आलेला
असतो. व्यंगचित्राविषयी भीतीची भावना
निर्माण झाल्याने काही शासकीय-निमशासकीय नियतकालिकांनी व्यंगचित्रे छापणे बंद
केले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, व्यक्तिस्वातंत्र्य यांचा आधार घेवून
देशद्रोही विचार पसरवण्याचा प्रयत्न काही व्यंगचित्रकार करतांना आढळून
आले आहे. अशा वातावरणात ‘अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून व्यंगचित्र व
अर्कचित्र कलेचे महत्त्व आणि प्रभाव’ सहज लक्षात येतोच पण व्यंगचित्रकारांनी किती सजग
रहावयास हवे,
याचीही
जाणीव होते.
राजेंद्र
सरग
9423245456