Saturday, March 12, 2016

व्‍यंगचित्र




            व्‍यंगचित्र आणि चित्रकला यामध्‍ये मूलभूत फरक कोणता असेल, तर तो आहे विचारांचा. चित्रकार कोणतेही चित्र रेखाटतांना त्‍यातील सौंदर्यस्‍थळांचा शोध घेईल. याउलट व्‍यंगचित्रकार त्‍यातील विसंगतीचा प्राधान्‍याने विचार करील. रंग हा चित्रकलेचा आत्‍मा आहे तर  विसंगती हा व्‍यंगचित्राचा आत्‍मा. असे असले तरी व्‍यंगचित्रातून काव्‍यात्‍म आशय, सार्वकालिक सत्‍य समर्थपणे चितारता येते. थोडक्‍यात,  व्‍यंगचित्रे काढणे वाटते तितके सोपे नाही. भरपूर वाचन, निरीक्षण, चिंतन त्‍याचबरोबर कल्‍पनाशक्‍ती, विनोदबुद्धी आणि रेषांची जोड असल्‍याशिवाय व्‍यंगचित्र रेखाटण्‍याची कल्‍पनाच करणे चुकीचे आहे.
            जगण्‍या-वागण्‍यातील विसंगती अचूकपणे टिपण्‍याची ताकद व्‍यंगचित्रात असते. वृत्‍तपत्रातून प्रसिध्‍द होणारी काही व्‍यंगचित्रे ही तात्‍कालिक असली तरी त्‍या-त्‍या काळातील एकूणच समाजजीवनाचे, त्‍यातील आंतरविरोधाचे, संघर्षाचे दर्शन त्‍यातून होत असते. व्‍यंगचित्राला विषयाचे  बंधन नसते. अंत नसतो, मुक्‍काम नसतो. जुन्‍या दिवाळी अंकांतील, वृत्‍तपत्रातील व्‍यंगचित्रांचे विषय पाहिल्‍यास आपल्‍याला हे पटते. आजच्‍या काळात माहिती-तंत्रज्ञानावर आधारित मोबाईल, इंटरनेट, सोशलमिडीया, सेल्‍फी, अंतराळ संशोधन अशा नवनवीन विषयांसह कौटुंबिक, अंधश्रध्‍दा निर्मूलन, पाणीटंचाई, कृषि समस्‍या, आरोग्‍य अशा विविध विषयांवरील व्‍यंगचित्रे पहावयास मिळतात.  रोजच्‍या जीवनातील विषय आकर्षक आणि नेमक्या व्‍यक्‍तिरेखा घेवून  चेह-यावरील हावभावासह चितारल्‍या तर त्‍यास वाचकांची दाद मिळाल्‍याशिवाय राहत नाही. सोशल मिडीयावर, संस्‍थळांवर व्‍यंगचित्रांना मिळणारा प्रतिसाद पाहिल्‍यानंतर हे लक्षात येते. दैनिक वृत्‍तपत्रात प्रसिध्‍द होणारी  व्‍यंगचित्रे सामान्‍य माणसाच्‍या कोंडमा-याला वाट मोकळी करुन देणारी असतात. त्‍यामुळे अशा व्‍यंगचित्रांची लोकप्रियता, महत्‍त्‍व आजही टिकून आहे. तथापि, अग्रलेखापेक्षा व्‍यंगचित्राला मिळणारे महत्‍त्‍व पाहून काही संपादकांनी व्‍यंगचित्रांवर अघोषित बहिष्‍कार टाकलेला जाणवतो.
            व्‍यंगचित्राला फुलाप्रमाणे कोमल आणि सुरंगाप्रमाणे स्‍फोटक समजले जाते. व्‍यंगचित्रांवरुन अधून-मधून वाद होतांना दिसतात. काही वेळेस हिंसाचारही  झालेला आहे. अशा वेळेस व्‍यंगचित्र हे अण्‍वस्‍त्रापेक्षा भयानक असल्‍याची जाणीव होते. राजकारणात विशेषत: निवडणुकीच्‍या दरम्‍यान व्‍यंगचित्रांचा होणारा वापर सर्वच उमेदवारांना घाम फोडणारा असतो.  तसे पाहिले तर कोणत्‍याही व्‍यंगचित्रातून कमीत कमी दोन अर्थ निघतातच. एक सकारात्‍मक आणि दुसरा नकारात्‍मक. जो ज्‍या दृष्‍टिने पाहील त्‍या दृष्‍टिने त्‍याला व्‍यंगचित्र दिसेल. त्‍यामुळे व्‍यंगचित्र रेखाटतांना अभिव्‍यक्‍ती स्‍वातंत्र्यापेक्षा कोणाच्‍या भावना दुखावल्‍या जाणार नाहीत ना, याची दक्षता व्‍यंगचित्रकारांना घ्‍यावी लागते.
            व्‍यंगचित्र ही उत्‍कृष्‍ट भाषा आहे. भाषांच्‍या सीमा ओलांडून जाण्‍याची क्षमता व्‍यंगचित्रात आहे.  मात्र व्‍यंगचित्रकारांची संख्‍या फारच कमी आहे. भाषानिहाय तर ते अल्‍पसंख्‍याकच  ठरतात. व्‍यंगचित्रकलेच्‍या प्रतिष्‍ठेसाठी, प्रगतीसाठी सर्वांनी एकत्रितरित्‍या प्रयत्‍न करायला हवेत. राष्‍ट्रीय आणि आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर या क्षेत्रात कोणते नावीन्‍यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. कोणत्‍या स्‍पर्धा आयोजित केल्‍या जात आहेत. याबाबत माहितीची देवाण-घेवाण व्‍हावयास हवी. त्‍यासाठी नियमित संवाद झाला पाहिजे. संवादांची विविध माध्‍यमे उपलब्‍ध असतांना राष्‍ट्रीय अथवा आंतरराष्‍ट्रीय व्‍यंगचित्र स्‍पर्धेत मराठी व्‍यंगचित्रकारांची अनुपस्‍थिती ठळकपणे जाणवते.  व्‍यंगचित्र क्षेत्रात नवनवीन कलाकार येण्‍यासाठी आणि  रसिकांची संख्‍या वाढण्‍यासाठीही जाणीवपूर्वक प्रयत्‍न केले गेले पाहिजेत. 

  कोणतीही कला कापराच्‍या वडीप्रमाणे असते. तिच्‍यात सातत्‍य, सराव नसेल तर कापराच्‍या वडीप्रमाणे केव्‍हा वाफ होवून नष्‍ट होईल, हे सांगता येत नाही. म्‍हणूनच व्‍यंगचित्रकलेचा दर्जा  आणि रसिकांची अभिरुची  वृध्‍दींगत करण्‍यासाठी सर्वसमावेशक प्रयत्‍नांची गरज आहे.

राजेंद्र सरग
9423245456